Friday, May 18, 2018

VEDAAS -- The timelines of VEDA existence 4.5K to 6K or 6K to 8K years back

LokManya TILAK research on timelines of Vedaas. Irrefutable arguments using math and star positions showing timelines of Vedas as at least 4.5K to 6K years back or some references go back to 6K to 8K years back.

जिज्ञासूंनी लोकमान्यांचे तिन्ही ग्रंथ जरूर वाचावेत. ओरायन आणि आर्क्टिक होम इन वेदाज् : "ORION" and "Arctic Home of Vedaas" books are available for free on internet.

Excerpt from below "यावरून, वसंतसंपाताच्या आर्द्रा नक्षत्रातल्या सगळ्यात जुन्या उल्लेखापासून आताच्या त्याच्या जागेपर्यंत सहा हजार ते आठ हजार वर्षं लागली असणार आणि मृगात होणाऱ्या वसंतसंपाताच्या सूर्योदयापासून आजपर्यंत साडेचार हजार ते सहा हजार वर्षं गेली असणार. क्षितिजावरची सूर्योदयाची जागा निश्चित करण्यासाठी क्षितिजाचे अगदी बिनचूक ३६० अंशात विभाग करण्याची पद्धत वेदकाळात नव्हती, तर तिथं उगवणाऱ्या नक्षत्राच्या नावानं विभाग करण्याची तेव्हा पद्धत होती. ते विभाग एकसारख्या लांबीचे नसण्यानं किती वर्षं वसंतसंपात एखाद्या नक्षत्रात होता, हे सांगता येत नाही; पण तरीसुद्धा वेदांचा उगमकाळ पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच मागं जातो."

======= Full Article below =====
कुठून आले वेद? कोण होते आपले पूर्वज?

वेदकालाच्या निश्चितीसंदर्भात लोकमान्य टिळक यांनी केलेल्या संशोधनाला आता पुरातत्वशास्त्रानुसार पुरावे सापडू लागले आहेत. युरोपीय आणि आशियाई ध्रुवीय परिसरात, आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेस आणि युरल पर्वतालगत पूर्वेस रशियन संशोधकांनी केलेल्या उत्खननात आधुनिक मानवाचं अस्तित्व आणि वैदिक पद्धतीचं जीवन यांचे पुरावे आढळून आले आहेत.
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हे संशोधकही होते. आपण राजकारणात पडलो नसतो तर संशोधक होणंच पसंत केलं असतं, असं ते स्वतःच म्हणत असत. त्यांनी लिहिलेला गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथराज तर सगळ्यांनाच परिचित आहे. ओरायन आणि आर्क्टिक होम इन वेदाज् (वैदिक आर्यांचे मूलस्थान) हे त्यांचे आणखी दोन महत्त्वाचे ग्रंथ. जुन्या पिढीतल्यांना लोकमान्यांचे हे ग्रंथ ठाऊक असतात; पण बहुतेकांनी ती वाचले नसतील. हल्लीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते ऐकनूही माहीत नसावेत.

लोकमान्य हे प्राचीन भारतीय ग्रंथांचे दीर्घ काळ अभ्यासक होते. त्यांचा सखोल आणि विस्तृत अभ्यास गीतारहस्यच्या वाचकाला थक्क करून टाकतो. ओरायन आणि आर्क्टिक होम इन वेदाज्‌’ हे त्यांचे ग्रंथ वाचण्याची पुरेशी इच्छाशक्ती गेल्या काही वर्षांतच माझ्यात निर्माण झाली. हे दोन्ही ग्रंथ शोधनिबंध (थिसिस) असूनही फारच रंजक आहेत. त्यातही निरनिराळ्या ग्रंथांमधून माहिती मिळवण्याच्या लोकमान्यांच्या चिकाटीचं आणि आळस करता अभ्यास करून आणि विखुरलेली माहिती सुसूत्रपणे जोडून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याच्या कौशल्याचं आश्चर्य वाटत राहतं. लोकमान्यांच्या विस्मयकारक बुद्धिमत्तेचं दर्शन घडवणारे आणि साध्या, सोप्या इंग्लिश भाषेत लिहिलेले असे हे शोधनिबंध आहेत. त्यांतलं संशोधन खगोलशास्त्रावर आधारित असलं, तरी ते कुणाही सर्वसामान्य वाचकाला सहज समजेल. खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर ते समजायला अगदीच सोपे आहेत.

एकोणिसाव्या शतकात पूर्वेकडचे बहुतेक सगळेच देश युरोपीय देशांच्या ताब्यात होते. त्यामुळं पूर्वेच्या देशातले समाज आणि संस्कृती यांच्याबद्दल युरोपात लोकांना फारच कुतूहल होतं आणि या समाज-संस्कृतीविषयीचे खूप अभ्यासकही होते. पुरातन भारतीय साहित्याचेही अनेक अभ्यासक होते. त्यात वेदांचा उगम कधी झाला, याविषयी खूपच चर्चा होती. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीही, आजच्याप्रमाणेच, इतिहाससंशोधनावर तत्कालीन राजकारणाचा ठसा असेच! भारत देश ब्रिटिशांनी जिंकून घेतला होता; त्यामुळं काही संशोधकांचा सूर, जे जे भारतीय ते ते कुठून तरी उसनं तरी आणलं असणार किंवा सांगितलं जातं तेवढं प्राचीन तर नसणारच, असा असे! तशातच, संशोधकांना इजिप्तमधल्या प्राचीन लिपी वाचता आल्यावर नाईल नदीच्या खोऱ्यातल्या प्राचीन फराओ सम्राटांच्या संस्कृतीचं रहस्य उलगडल्यानं त्या संस्कृतीचा काळ निश्चित करता आला. त्यानंतर, बाकी सगळ्या संस्कृती नाईल संस्कृतीनंतरच्याच असल्याचं मानण्याकडं अभ्यासकांची प्रवृत्ती होती. त्यामुळं वेदांची कालनिश्चिती ख्रिस्तपूर्व दोन हजार ४०० वर्षांपलीकडं (आजपासून सुमारे चार ४०० वर्षं) कुणी नेत नव्हतं. टिळकांसारख्या देशाभिमानी अभ्यासकाला हे अर्थातच पटणारं नव्हतं. त्यांनी वेद आणि प्राचीन भारतीयांनी वेदांवर लिहिलेले ग्रंथ आणि आधुनिक युरोपीय अभ्यासकांचे शोध, पारशी धर्मग्रंथ आणि ग्रीक दंतकथा यांच्या सखोल आणि सविस्तर अभ्यासातून जे निष्कर्ष काढले, ते ओरायन या शोधनिबंधात मांडलेले आहेत. तो शोधनिबंध १८९२ मध्ये लंडनमध्ये भरलेल्या नवव्या पौर्वात्य संमेलनात (नाइन्थ ओरिएंटल काँग्रेस) पाठवण्यात आला होता. तो तिथं वाचला गेला. मात्र, त्याच्या विस्तारामुळं तो संमेलनाच्या इतिवृत्तात सारांशरूपात घेतला गेला. ऑक्टोबर १८९३ मध्ये लोकमान्यांनी तो काही सुधारणा करून पुस्तकरूपात पूर्णतः प्रसिद्ध केला. ऋग्वेदाच्या उगमाचा काळ आजपासून सहा हजार ४०० वर्षांच्या अलीकडचा नसावा, हे ओरायनमध्ये अनेक पुरावे देऊन लोकमान्यांनी सिद्ध तर केलंच; पण त्यावर येऊ शकणारे विरोधी मुद्दे आणि संशोधकांनी तोपर्यंत केलेली मांडणीसुद्धा सप्रमाण खोडून काढली. त्यासाठी त्यांनी वेदकालातल्या कालगणनेच्या पद्धतीचा उपयोग केला.

वेदकाळातल्या कालमानाविषयी त्यांचं कुतूहल भगवद्गीतेचा अभ्यास करताना जागं झालं होतं. गीतेच्या १० व्या अध्यायात, अर्जुनानं हे देवा, तुमचं चिंतन करताना मी तुम्हाला कशाकशात पाहावं? असं विचारल्यावर भगवान श्रीकृष्णानं प्रत्येक वस्तुमात्रात मी प्रथम, मध्य आणि शेवट आहे...जसं, पर्वतांमध्ये मी मेरू आहे, ऋतूंमध्ये मी वसंत आहे, असं सांगताना मी महिन्यांमधला मार्गशीर्ष आहे,(अध्याय १०, श्लोक ३५) असं म्हटलं आहे. अर्थातच, मार्गशीर्ष हा काही भारतीय वर्षाचा पहिला महिना नाही; मग श्रीकृष्ण असं का म्हणाला असावा? कारण, कधीकाळी मार्गशीर्ष हा वर्षाचा पहिला महिना मानला जात असावा, असे समजून अभ्यास करताना लोकमान्यांना असं आढळलं, की वर्षाची सुरवात वसंतसंपातापासून (व्हर्नल इक्विनॉक्सपासून) मानत असत. (तसंच निरनिराळ्या काळात आणि निरनिराळ्या ठिकाणी सुरवात ऑटम्नल् इक्विनॉक्, विंटर सोल्स्टाइस, म्हणजे उत्तरायणाची सुरवात, समर सोल्स्टाइसपासूनही मानली जात असे. आजही भारतात वर्षारंभ विविध प्रांतांत निरनिराळ्या महिन्यांपासून मानतात). म्हणजे वसंत ऋतूत ज्या दिवशी प्रकाश आणि काळोखाचा कालावधी (बोलीभाषेत दिवस आणि रात्र) हे एकाच लांबीचे असतात, त्या दिवसाच्या सूर्योदयापासून नवं वर्ष सुरू झाल्याचं मानलं जात असे. त्या काळी वसंतसंपाताचा सूर्योदय जिथं क्षितिजावर मृग नक्षत्र उदयाला येतं तिथं होत असे, म्हणून त्या महिन्याचं नाव मार्गशीर्ष (हरिणाचं शिर) आणि तो वर्षाचा पहिला महिना. त्यामुळं श्रीकृष्णानं ते एक उदाहरण भगवद्गीतेत दिलं. लोकमान्यांना खगोलशास्त्रातल्या एका विशेष गोष्टीचा उपयोग वेदांचा काळ ठरवण्यात झाला. वसंतसंपाताचा सूर्योदय कायम एकाच नक्षत्रात होता तो हळूहळू सरकत (प्रोसेशन ऑफ इक्विनॉक्) असतो. त्यामुळं वर्षाचा पहिला सूर्योदय मृगातून रोहिणी, कृत्तिका असा क्रमाक्रमानं, २७ नक्षत्रांच्या संपूर्ण चक्रातून घसरत असतो. ही घसरण अतिशय धीम्या गतीनं, म्हणजे १२ वर्षांत एक अंश (१०० वर्षांत .३८ अंश) होत असते. या गतीनं क्षितिजाची एक फेरी पूर्ण करायला वसंतसंपाताच्या सूर्योदयाला सुमारे २६ हजार वर्षं (३६० अंश गुणिले ७२ वर्षं म्हणजे २५ हजार ९२० वर्षं) लागतात. वसंतसंपाताचा सूर्योदय मृग नक्षत्रात होतो, असा उल्लेख ऋग्वेदात आहे आणि त्यापूर्वी तो मृगाच्या पलीकडच्या आर्द्रा नक्षत्रात होत असे, अशा आठवणीचे पडसाद दंतकथेच्या स्वरूपात सापडतात. तोच पुढं तैत्तिरीय संहितेत कृत्तिकेत (Pleiades) होत असल्याचा उल्लेख आहे आणि वेदांगज्योतिषात तोच भरणी नक्षत्रात होतो, असा उल्लेख आहे. सध्याच्या वर्षाची सुरवात वसंतसंपात रेवती नक्षत्रात गृहीत धरून करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात वसंतसंपात १९ अंशांनी सरकला आहे. यावरून, वसंतसंपाताच्या आर्द्रा नक्षत्रातल्या सगळ्यात जुन्या उल्लेखापासून आताच्या त्याच्या जागेपर्यंत सहा हजार ते आठ हजार वर्षं लागली असणार आणि मृगात होणाऱ्या वसंतसंपाताच्या सूर्योदयापासून आजपर्यंत साडेचार हजार ते सहा हजार वर्षं गेली असणार. क्षितिजावरची सूर्योदयाची जागा निश्चित करण्यासाठी क्षितिजाचे अगदी बिनचूक ३६० अंशात विभाग करण्याची पद्धत वेदकाळात नव्हती, तर तिथं उगवणाऱ्या नक्षत्राच्या नावानं विभाग करण्याची तेव्हा पद्धत होती. ते विभाग एकसारख्या लांबीचे नसण्यानं किती वर्षं वसंतसंपात एखाद्या नक्षत्रात होता, हे सांगता येत नाही; पण तरीसुद्धा वेदांचा उगमकाळ पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच मागं जातो. ही जी घसरण होते, तिचं कारण आहे पृथ्वीचा डुलणारा आस (ॲक्सिस). आस म्हणजे उत्तर-दक्षिण ध्रुवांमधून, पृथ्वीच्या पोटातून आरपार जाणारी काल्पनिक रेषा. त्या रेषेच्या भोवती पृथ्वी भोवऱ्यासारखी फिरत असते. वेग कमी झाल्यावर भोवऱ्याचा आस जसा वर्तुळात डोलू लागतो, त्याचप्रमाणे पृथ्वीचाही आस डुलतो. त्याचं कारण, पृथ्वीच्या गरगर फिरण्यावर होणारा सूर्य-चंद्र यांच्या आणि दूरच्या इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम. अशा पद्धतीनं वर्षांच्या पहिल्या दिवसाच्या घसरणीवरून वेदांचा काळ ठरल्यावर - जर तो मान्य नसेल तर - तो अलीकडं येता आणखी २६ हजार वर्षं मागं जाईल. कारण, मृग नक्षत्रात वसंतसंपाताचा सूर्योदय होण्याची स्थिती त्याआधी आजपासून ३२ हजार -३३ हजार वर्षांपूर्वीच शक् होती. तशी स्थिती यापुढं सुमारे २० हजार वर्षं पुन्हा येणार नाही. याचा उल्लेख लोकमान्यांनी त्यांच्या संशोधनात केला; पण त्यांनी स्वतःच, वेदांचा काळ इतका पुरातन असेल, असं मान्य केलं नाही. वर्षाच्या सुरवातीचा दिवस घसरणीमुळं बदलावा लागत होता. मात्र, सूर्योदयाबरोबर सुरू झालेल्या वर्षाच्या महिन्यांची मोजणी चंद्राच्या कलांवरून होते; पण ऋतूंच्या नियमित बदलाचा संबंध पृथ्वीचा कललेला आस आणि तिचा सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा मार्ग यांच्याशी आहे; चंद्राशी नव्हे. ऋतुचक्र चांद्रवर्षापेक्षा अधिक काळाचं असतं; त्यामुळं महिने आणि ऋतू यांचा मेळ बिघडतो. तो परत जुळवायला अधूनमधून वर्षात १३ वा महिना जोडला जातो. मात्र, वसंतसंपाताच्या सरकण्यानं होणाऱ्या बदलावर तसा कोणताच उपाय नसल्यानं वर्षाचा पहिला महिनाच बदलणं भाग होतं. त्यामुळंच कोणे एकेकाळी मार्गशीर्षात वसंतसंपात येत असे आणि तेव्हाच वर्षारंभ होत असे. त्यामुळं गीतेतला उल्लेख हा त्या प्राचीन काळचं प्रतिबिंब होतं. मार्गशीर्षाचं दुसरं नाव अग्रहायण (म्हणजे अयनाचं अग्र, वर्षाची सुरवात) असंही आहे. वेदांमध्ये त्याहून आधीच्या आर्द्रा नक्षत्रात वर्षारंभ होत असल्याचं दंतकथांमधून दिसत असल्यानं लोकमान्यांनी वेदांचा काळ आणखी पुरातन असण्याची शक्यता बोलून दाखवली. शिवाय, असं नक्षत्रांच्या परिस्थितीचं वर्णन करण्याआधी कित्येक शतकं तिचा शोध लागलेला असेल, म्हणजे वेदांचा काळ माणसाच्या आठवणीच्या सुरवातीपर्यंत मागं जातो. लोकमान्यांचे निष्कर्ष काही संशोधकांनी मान्य केले, तर काहींनी त्या निष्कर्षांना विरोध केला.

ओरायन आणि आर्क्टिक होम इन वेदाज्‌’ या ग्रंथांसाठी वेद, ब्राह्मण, संहिता, उपनिषदं इत्यादी ग्रंथ, त्या ग्रंथांवरचे प्राचीन आणि आधुनिक विद्वानांनी केलेले अभ्यास आणि त्या ग्रंथांमधले परस्पर आधार देणारे आणि विरोध करणारे संदर्भ, असं विपुल संशोधन लोकमान्यांनी केलं. त्या संशोधनाच्या कामात ऋग्वेदातलं उषःसूक्त, तैत्तरीय संहितेतली ३० उषांची, तसेच तीन-चार महिन्यांची रात्र, दिवसा आकाशात कित्येक महिने कुंभकाराच्या चाकाप्रमाणे फिरत राहणारा सूर्य यांच्या उल्लेखांचाही लोकमान्यांनी अर्थ लावला. वेदांच्या प्राचीन भारतीय संशोधकांना दररोज होणाऱ्या उषःकालाचाच अनुभव होता; त्यामुळं उषःकालाविषयी वेदकालातल्या ऋषींना इतकी उत्कंठा का वाटत असे, असा त्यांना प्रश् पडला होता. शिवाय, वर उल्लेख केलेले निसर्गाचे चमत्कार त्यांना केवळ काल्पनिकच वाटत. कारण, अशी परिस्थिती असलेला प्रदेश त्यांना माहीतच नव्हता; त्यामुळं त्याविषयी कुणीही भाषांतरकार, अभ्यासक किंवा cc सयुक्तिक खुलासा दिलेला नव्हता. मात्र, १९ व्या शतकात प्रवासी-संशोधकांनी जे ध्रुवप्रदेशातल्या दिवस-रात्रींचे प्रत्यक्ष अनुभव लिहिले, त्यावरून लोकमान्यांनी असा निष्कर्ष काढला, की वेदांमधल्या उषांचं वर्णन हे ध्रुवप्रदेशातल्या प्रवाशांनी केलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळतं. अनेक महिन्यांच्या रात्रीनंतर दिवसाची चाहूल देणाऱ्या उषःकालाची उत्कंठायुक्त वाट तिथला रहिवाशांनी पाहणं हे स्वाभाविकच होतं. आता आपण इंटरनेटवर हे पाहू शकतो, की २३. अंश उत्तर रेखांशावर (Arctic Circle), तसंच त्याच्या उत्तरेला उत्तर ध्रुवापासून अर्ध्या अंतरावर आणि प्रत्यक्ष उत्तर ध्रुवावर कधी पहिला उषःकाल होईल, त्यानंतर सूर्य क्षितिजावर संपूर्णपणे येण्याआधी कितीदा किंचित वर डोकावून थोडासाच पश्चिमेला सरकत पुन्हा काही मिनिटांतच अस्ताला जाईल, दररोज तो थोडा थोडा अधिक काळ क्षितिजाजवळ राहील; ज्यामुळं उषःकालांची एक मालिकाच दिसेल. सूर्य अखेर पूर्णपणे क्षितिजाच्या वर येऊन सतत आभाळात भ्रमण करत कित्येक महिने प्रकाशत राहील. त्यानंतर उषःकालाच्या उलट्या क्रमानं संध्याकाळांच्या मालिकेनंतर पूर्ण रात्र होईल, जी कित्येक महिने टिकेल.

लोकमान्यांनी तर्क केला, की त्या काळी तो संपूर्ण प्रदेश आजसारखा बर्फाळ नव्हता. उलट, माणसाच्या वसतीला अनुकूल होता आणि वेदांचे कर्ते किंवा त्यातल्या संकल्पनांचे कर्ते त्या प्रदेशात १०-१२ हजार वर्षांपूर्वी वास्तव्य करून होते. तो निष्कर्ष त्यांनी सविस्तर, अनेक पुराव्यांसह आर्क्टिक होम इन वेदाज्‌’ या अभ्यासनिबंधात मांडला. मात्र, हिमयुगात त्यांचं वसतिस्थान बर्फानं झाकलं गेल्यावर तिथून ते लोक स्थलांतर करून मध्य आशियात गेले. तिथून आजचा इराण, भारत आणि दक्षिण युरोप या ठिकाणी विखुरले. लोकमान्यांनी त्यांच्या निष्कर्षाला पूरक अशी अनेक उदाहरणं ग्रीक आणि युरोपातल्या इतर दंतकथांमधून आणि पारशी धर्मग्रंथांमधून घेतली आहेत आणि त्यातून वेदांचे कर्ते हे आशिया किंवा युरोप खंडांच्या ध्रुवप्रदेशात अतिप्राचीन काळी वास्तव्य करून होते, असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. इजिप्शियन संस्कृतीपेक्षा काहीच प्राचीन असू शकत नाही, या विचाराला घट्ट धरून राहणाऱ्या विद्वानांना हे निष्कर्ष पटणारे नव्हते; तसंच इतक्या जुन्या काळी आधुनिक मानव ध्रुवप्रदेशात नव्हता, असा समज आजपर्यंत होता. शिवाय, लोकमान्यांच्या तर्काला पुरातत्वशास्त्राचा पुरावा नव्हता. इजिप्शियन पिरॅमिड्समध्ये सापडणारे फराओंचे रासायनिक प्रक्रियांनी जतन केलेले मृतदेह, मूल्यवान वस्तू, इत्यादी पुराव्यांची सवय लागलेल्या पुरातत्ववेत्त्यांना असला तोंडी पुरावा पुरेसा वाटणं शक्यच नव्हतं. गुलामगिरीत पडलेल्या भारतीयांची सांस्कृतिक पाळंमुळं इतकी पुरातन असू शकतात, यावर त्यांचा विश्वास बसणं शक् नव्हतं; त्यामुळं लोकमान्यांच्या संशोधनाला त्यांच्या काळात पुरेसं महत्त्व मिळालं नाही आणि आता आपण ते पुरतं विसरून गेलो आहोत.
*
मात्र, आता लोकमान्यांच्या संशोधनाला पुरातत्वशास्त्रानुसार पुरावे सापडत आहेत. युरोपीय आणि आशियाई ध्रुवीय परिसरात, आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेस आणि युरल पर्वतालगत पूर्वेस रशियन संशोधकांनी केलेल्या उत्खननात अनुक्रमे, आधुनिक मानवाचं अस्तित्व आणि वैदिक पद्धतीचं जीवन यांचे पुरावे सापडत आहेत. मामेतोव्होया कुर्या हे ठिकाण युरल पर्वताच्या अती-उत्तरेच्या टोकाशी ध्रुवीय प्रदेशात आहे. तिथं आधुनिक मानवाचा, म्हणजे आपल्यासारख्या माणसाचा, ३६ हजार ते ४० हजार वर्षांपूर्वी वावर असावा, अशा खुणा सापडल्या आहेत. त्याहूनही उत्तरेला, रशियाच्या आर्क्टिक समुद्रकिनाऱ्यावर आणि नॉर्वे देशातल्या समुद्राच्या खाड्यांच्या (फियोर्ड) किनाऱ्यावर अतिप्राचीन, म्हणजे आजपासून पाच हजार ते तीन हजार ८०० वर्षांपूर्वीच्या विकसित संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. युरल पर्वताच्या पूर्वेस चार हजार २०० ते तीन हजार ६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. ते ऋग्वेदात वर्णन केलेल्या जीवनशैलीशी जुळतात, असं रशियन आणि इतर देशांच्या संशोधकांचं म्हणणं आहे. त्या संस्कृतीला सिन्स्ताश्ता-अर्काइम संस्कृती असं नाव देण्यात आलं आहे. तिथं सापडलेलं वसतिस्थान ऋग्वेदातल्या मंडलरचनेचं आहे. म्हणजे, चार प्रमुख दिशांना उघडणारे दरवाजे असणाऱ्या वर्तुळाकार खंदकाच्या आणि तटबंदीच्या आत, दोन वर्तुळांत बांधलेली घरं आणि मध्यभागी सार्वजनिक चौक अशी रचना आहे. तिथं ब्राँझ मिश्र धातूवर काम केलं जात असे. घोड्यांच्या बळीचा उल्लेख ऋग्वेदात आहे, तशा बळीच्या खुणा तिथं आढळतात. दहा आऱ्या (स्पोक्) असलेल्या, सुमारे एक मीटर व्यासाच्या चाकांचे अरुंद असे रथ, घोडे इतर वस्तूंसह मृतदेहांचा दफनविधी वैदिक पद्धतीनं झाला असावा, असे पुरावे आहेत. कर्मकांडासाठी निराळ्या जागा आहेत. मृतदेहाच्या मानवी शिराच्या जागी घोड्याचं शिर लावून केलेलं दफनही आढळलं आहे. गाईच्या बळीचे पुरावेही सापडतात. हे ठिकाण जरी ध्रुवप्रदेशात नसलं, तरी ते हिमयुग आल्यावर ज्या मार्गानं वेदांच्या कर्त्यांचं भारत, इराण आणि दक्षिण युरोप या ठिकाणी स्थलांतर झालं असावं, त्या मार्गात ते नक्कीच आहे. जिज्ञासूंना ध्रुवप्रदेशातल्या सूर्याच्या उदयास्ताची माहिती इंटरनेटवर Athropolis Guide to Arctic Sunrise and Sunset वरून मिळेल आणि Russian Arctic Archaeology वर शोध घेतला तर पुरातत्वविषयक सचित्र माहिती भरपूर मिळेल.
एकूणच लोकमान्यांच्या संशोधनाच्या निष्कर्षांना आता प्रत्यक्ष पुरावा मिळू लागला आहे. त्यावरून केवळ त्यांच्या कुशाग्र बुद्धीचीच प्रचीती येते असं नसून, वेदांचं आणि इतर पुरातन वाङ्मयाचं केवळ पाठांतरानं शब्दन्शब्द जतन करणाऱ्या आपल्या पूर्वजांचंही आश्चर्य वाटतं. त्यांचा खटाटोप निरर्थक नव्हता, तसंच वेद हे केवळ दंतकथा नाहीत, तर ते मानवाच्या बुद्धीच्या विकासाचे आलेख आहेत हे पटतं. गंमत अशी की वेदातले पुरावे केवळ तोंडी म्हणून धुडकावणाऱ्या पाश्चात्य संशोधकांचे आधुनिक वारसदार आता अमेरिका खंडाच्या ध्रुवीय प्रदेशातल्या मानवाच्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी अलास्का आणि कॅनडातल्या आदिवासी जमातींच्या दंतकथांचा अभ्यास करत आहेत.

जिज्ञासूंनी लोकमान्यांचे तिन्ही ग्रंथ जरूर वाचावेत. ओरायन आणि आर्क्टिक होम इन वेदाज्‌’ इंटरनेटवर वाचायला विनामूल्य उपलब्ध आहेत. शिवाय पुस्तकांच्या दुकानातही हे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातून ज्ञान, मनोरंजन तर मिळतंच; शिवाय वाद-विवादकला, सोप्या भाषेत कठीण विषयाची मांडणी करण्याचं कौशल्य इत्यादी अनेक गोष्टी शिकता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, केवळ बौद्धिक क्षमता, बारीक निरीक्षण, अभ्यासाचं सातत्य, अफाट स्मरणशक्ती यांच्या जोरावर संशोधनातल्या अडचणींवर तुटपुंज्या साधनांद्वारेही मात करणाऱ्या आपल्या पूर्वजांच्या प्रज्ञेची आताच्या संगणकयुगात कल्पना येते आणि त्याच परंपरेचे लोकमान्य टिळक हे उत्तम उदाहरण होते, हे पटतं.

Related Article on REAL SUN SIGN
Your REAL Sun Sign: http://astromnc.blogspot.com/2009/07/your-correct-real-sun-sign.html


साभार: वन्दे मातरम् समुह

1 comment:

  1. https://www.youtube.com/watch?v=MXxRcXHI_tI Pls. see this viedo for ushhakal at Artict circle.

    ReplyDelete